पालकमंत्र्यांना मुलीला उपमहापौर करायचे होते

Foto


छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेना वाढविण्यासाठी काम केले, परंतु खासदारकीला संधी मिळाली नाही, आमदारकीला डावलले, त्यामुळे आता उपमहापौरपदी पक्षाने माझे नाव दिले, यात विघ्न आणण्याचे कारणच नव्हते. पालकमंत्री संजय शिरसाट यांना मुलगी हर्षदा यांना उपमहापौर करायचे होते, असा दावा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केल्याने दोघांमध्ये अजूनही सख्य नसल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेत पालकमंत्री शिरसाट व जिल्हाप्रमुख जंजाळ यांच्यातील वाद महापालिका निवडणुकीत विकोपाला गेला होता. निवडणूक संपली तरी वादाची धग कायम आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी उपमहापौरांची निवडणूक झाल्यानंतर आला. उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी महापालिकेसह शहरभर मोठा जल्लोष केला. पालकमंत्री शिरसाट यांना डिवचण्यासाठी पोस्टर्सही झळकावण्यात आले.